बड्या धेंडांची कर्जमाफी (!) आणि बालीश पत्रकारिता...
बड्या धेंडांची कर्जमाफी (!) आणि बालीश पत्रकारिता... आजच्या बहुतेक सगळ्याच वृत्तपत्रांनी बँकांनी काही बड्या धेंडांची 68 हजार कोटींची कर्जे माफ केल्याची पहिल्या पानावर ठळक बातमी दिली आहे. सामान्य वाचकाला ती खरीच वाटते आणि बँकांमधे काय चाललं आहे असा प्रश्न पडायला लागतो. शिवाय या बड्या मंडळींसाठी कुणीतरी काम करीत आहे आणि बँकांच्या पैशाची वाट लावत आहे असा संभ्रम निर्माण झाला नाही तरच नवल. या अशा बातम्या म्हणजे चक्क वृत्तपत्रीय बालीशपणा आहे, भंपकगिरी आहे आणि काही तरी सनसनाटी निर्माण करण्यासाठी केलेला एक मूर्खपणा आहे असंच म्हणावं लागेल. राजकीय नेते, ज्यांना बँकिंगमधील काही समजत नाही ते ही मग बरळायला लागतात आणि त्यांचे अनुयायीही कोरसमधे तीच धून आळवायला लागतात. त्यामुळे यावर थोडी चर्चा करुन नेमकी काय भानगड आहे हे समजण्यासाठी हे छोटसं स्पष्टीकरण. मी एक बँकर आहे आणि तब्बल आठ वर्षे थकित कर्जे, राईट ऑफ आणि थकित कर्जाची तरतूद या विभागात काम केलेले आहे. त्यामुळे मला या विषयावर थोडं स्पष्टीकरण देण्याचा अधिकार आहे असं वाटतय. कोणताही व्यवसाय म्हटलं की त्यात धोका असतोच. अनेकांची उधारी वेळेवर येत न...